मंडणगड-वेळास मुख्य रस्त्यावर वेश्वी गावानंतर बाणकोट गाव व किल्ल्याकडे जाणारा रस्ता डाव्या बाजूस आहे तर मुख्य रस्ता गडाच्या टेकडीला वळसा घालून वेळासकडे जातो. गडाकडे जाणारा दाट आमराईतला घाटदार रस्ता बाणकोट टेकडीच्या माथ्यावरील पठारावर जातो. या ठिकाणी प्रथम गडाच्या मागील बाजूचा तट व तटाखालील खंदक दिसून येतो. किल्ला समुद्रकिनार्यावरील भू-शीरावर आहे. जमिनीकडील बाजूने सहजासहजी किल्ल्यात प्रवेश करता येऊ नये म्हणून हा खंदक खोदलेला होता. अशा प्रकारचा खंदक कोकणातील जयगड, देवगड, यशवंतगड इ. किल्ल्यांना आहे. अशा प्रकारचा खंदक असलेले किल्ले हे शिलाहार काळातील असावेत असा अंदाज आहे.
रस्त्यावर उतरून खंदकापर्यंत सरळ चालत जावे. खंदक अर्धवट बुजलेल्या स्थितीत आहे. खंदक डावीकडे ठेवून गडाला उजवीकडे वळसा घालत पुढे चालत रहावे. थोडे पुढे गेल्यावर खंदक बुजलेला दिसतो. तटबंदी व बुरूज डावीकडे ठेवत वळसा घालून वाट मुख्य दरवाजाजवळ जाते. दरवाजासमोरच समुद्रदर्शन होते.
किल्ल्यात चारही बाजूने तटबंदीच्या भक्कम भिंती दिसतात.
बांधकामाची दोन मोठी जोती किल्ल्यात आहेत. तसेच पश्चिमेकडे एक विहीर देखील आहे. या विहिरीशेजारील तटबंदीमधे पश्चिमाभिमुख दरवाजा आहे. हा मोठा दरवाजा नसून एक चोर दरवाजा आहे. किल्ल्याच्या तटबंदीच्या भिंती साधारण 3 ते 31/2 फूट जाड आहेत. किल्ल्याला एकूण 8 बुरूज आहेत.
निजामशाही संपल्यानंतर हा किल्ला विजापूरकरांच्या अधिपत्याखाली होता. इ.स. 1548 रोजी पोर्तुगीजांनी हा किल्ला घेतला व बाणकोट गावात जाळपोळ केली.
23 मे 1733 रोजी बंकाजी नाईक महाडिक यांनी बाणकोट जिंकून घेतला. 4 सप्टेंबर 1733 मधे बाणकोट किल्ल्याचा अधिकारी हरजी नाईक कदम याने बाजीराव पेशव्यांना पत्र लिहून सरखेल कान्होजी निवर्तल्यानंतर किल्ल्याच्या परिस्थितीचे वर्णन केले आहे. 22 सप्टेंबर 1733 रोजी सेखोजी आंग्रे बाणकोटात होते अशी माहिती आंग्रे शकावलीत आहे. इ. स. 1755 मध्ये कमांडर जेम्स या इंग्रज अधिकार्याने तुळाजी आंग्य्रांकडून बाणकोट जिंकून त्याचे फोर्ट व्हिक्टोरिया असे नामकरण केले. पुढे मराठे-इंग्रज तहानुसार इंग्रजांनी तो मराठ्यांना परत दिला व मराठ्यांनी ’फोर्ट व्हिक्टोरिया’ नाव बदलून पुन्हा ’हिम्मतगड’ ठेवले.
अधिक माहिती साठी www.ratnagiritourism.in या संकेत स्थळाला भेट द्या
लेख – डॉ. सचिन जोशी यांच्या ‘दुर्ग जिज्ञासा’ या पुस्तकातून (बुकमार्क पब्लिकेशन).
फोटो – विलास काणे, मंदार गोसावी